Close Visit MahaNews12

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाच्या प्रारूपावर हरकती मागविल्या, जाणुन घ्या.

मुंबई :  Maharashtra Govt employees Transfer :  राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित आणि सर्वसमावेशक धोरणाचे शासन निर्णय प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रारूपात शिक्षकांच्या बदल्यांशी संबंधित विविध नियम, पात्रता, विशेष संवर्ग तसेच अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्राबाबतच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रारूपावर काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या शासनाकडे पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, शासनस्तरावर झालेल्या बैठका तसेच न्यायालयीन प्रकरणांतील निर्णय यांचा विचार करून विविध शासन निर्णय, परिपत्रके आणि पत्रे एकत्रित करून हे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आल्याचे प्रारूपात नमूद करण्यात आले आहे.

अवघड क्षेत्रासाठी तीन निकषांची अट

नव्या प्रारूपानुसार, परिशिष्टात नमूद केलेल्या सात बाबींपैकी किमान तीन निकष पूर्ण करणारे गाव किंवा शाळा ‘अवघड क्षेत्र’ म्हणून निश्चित केली जाणार आहे. यामध्ये न येणारी गावे किंवा शाळा सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट होतील.

बदलीसाठी सेवाकालाची गणना संबंधित बदली वर्षाच्या ३१ मेपर्यंत पूर्ण झालेल्या सलग सेवेनुसार केली जाणार आहे. या धोरणाच्या दृष्टीने शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

अवघड क्षेत्रात ३ वर्षे सेवा झाल्यास बदली अधिकार

अवघड क्षेत्रातील शाळेत बदलीसाठी ग्राह्य धरली जाणारी सलग सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेल्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विचारात घेतले जाणार आहे.

तसेच पूर्वी अवघड क्षेत्रात असलेल्या मात्र नंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या शाळांमध्ये तीन वर्षांची सलग सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या सेवेलाही पुढील बदली वर्षात बदली अधिकारासाठी ग्राह्य धरण्याची तरतूद प्रारूपात आहे.

कोणत्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळले जाणार? Maharashtra Govt employees Transfer

पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे शिक्षक सामान्य बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित शिक्षकांनी बदलीसाठी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ अंतर्गत बदलीसाठी पात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त असलेले शिक्षकही या प्रक्रियेतून वगळले जाणार आहेत.

विशेष संवर्गातील शिक्षकांना महत्त्व. Maharashtra Govt employees Transfer

नव्या प्रारूपात विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ अंतर्गत विविध श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दिव्यांग शिक्षक, दिव्यांग किंवा मानसिक विकलांग मुलांचे पालक, काही गंभीर आजारांवरील उपचार घेत असलेले शिक्षक, विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला शिक्षक, माजी सैनिकांच्या पत्नी किंवा विधवा तसेच ३० जून रोजी ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक यांचा समावेश आहे.

काही विशिष्ट गंभीर आजारांनी ग्रस्त शिक्षकांचे जोडीदार तसेच संबंधित वैद्यकीय परिस्थितीतील शिक्षकांचाही विशेष संवर्गात समावेश करण्यात आला आहे. पात्रतेसाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे राहणार आहे.

पती-पत्नी एकत्रीकरणासाठीही तरतूद

पती-पत्नी एकत्रीकरणासाठी विशेष संवर्ग भाग-२ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. पती-पत्नी यांच्या नियुक्तीची ठिकाणे एकमेकांपासून ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्गाचा दर्जा मिळू शकतो.

यामध्ये दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असणे, एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी असणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम किंवा शासन अनुदानित संस्थेत कार्यरत असणे अशा विविध परिस्थितींचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वसाधारण शिक्षकांसाठी १० वर्षांची सेवा. Maharashtra Govt employees Transfer

नव्या प्रारूपातील महत्त्वाची बाब म्हणजे बदलीसाठी पात्र शिक्षकाची व्याख्या. सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी ग्राह्य धरली जाणारी सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली असणे आणि विद्यमान शाळेत ५ वर्षांची सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक असल्याचे प्रारूपात नमूद आहे.

मात्र, अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरताना काही परिस्थितीत सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षांची अट लागू राहणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अंतिम निर्णयाकडे शिक्षकांचे लक्ष

हे धोरण सध्या शासन निर्णयाचे प्रारूप असल्याने त्यातील तरतुदींवर शिक्षकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतिम शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर नियमांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी अंतिम शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्या बदली पात्रतेबाबत निर्णय घ्यावा.

टीप : वरील माहिती २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणाच्या प्रारूपावर आधारित आहे. महाराष्ट्र ग्रामविकास व पंचायत राज विभागाने यापूर्वी १४ मे २०२५ रोजी जिल्हांतर्गत बदली धोरणात सुधारणा आणि २८ मार्च २०२५ रोजी जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत स्वतंत्र कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत.

1 thought on “राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाच्या प्रारूपावर हरकती मागविल्या, जाणुन घ्या.”

Leave a Comment