Government Employee Pension : शेवटची नियमित वेतनवाढ मिळाल्यानंतर किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा करून निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना एका अतिरिक्त वार्षिक वेतनवाढीचा लाभ देऊन त्यानुसार वेतन व निवृत्तीवेतनाची फेरनिश्चिती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या फेरनिश्चितीनंतर निवृत्तीवेतन तसेच इतर निवृत्तीविषयक लाभांमध्ये होणाऱ्या फरकाची थकबाकी संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ही प्रक्रिया ९० दिवसांच्या आत पूर्ण करून थकबाकी अदा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती अबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी विविध याचिकांवर हा निर्णय दिला. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम १०चा विचार करताना, संबंधित कर्मचाऱ्याने एका वर्षात सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली असल्यास त्याला वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. Government Employee Pension
या प्रकरणात जालना जिल्हा परिषदेतील निवृत्त शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेवटची वेतनवाढ मिळाल्यानंतर त्यांनी आवश्यक कालावधीची सेवा पूर्ण केली असल्याने अतिरिक्त वेतनवाढ देऊन वेतनाची फेरनिश्चिती करावी, तसेच त्यानुसार निवृत्तीवेतन आणि इतर निवृत्तीविषयक लाभांची पुनर्गणना करून फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्यायालयाने यापूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला. ३० जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने संबंधित वर्षात आवश्यक सहा महिन्यांची सेवा पूर्ण केली असल्यास त्याची वार्षिक वेतनवाढ अर्जित झालेली मानली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यामुळे या निकषात बसणाऱ्या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची फेरनिश्चिती करून त्यानुसार निवृत्तीवेतन व अन्य निवृत्ती लाभांची पुनर्गणना करावी लागणार आहे. त्यातून थकबाकीची रक्कम निघाल्यास ती संबंधितांना देण्याचे आदेश आहेत.
मात्र, या प्रकरणांमध्ये विलंबाने न्यायालयात दाद मागण्यात आलेल्या प्रकरणांसाठी थकबाकीच्या रकमेवर व्याज देय राहणार नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. Government Employee Pension

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








