SIRचा मोठा परिणाम! महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे यादीतून गायब

पुणे :  Election Commission of India :  महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे पात्र मतदारांचे नाव यादीत राहिले आहे की नाही, याबाबत चिंता निर्माण झाली आहे. मात्र, ही नावे कायमस्वरूपी वगळण्यात आली आहेत, असे समजणे चुकीचे असून दावा-हरकतीच्या प्रक्रियेतून नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे.

SIRपूर्वी महाराष्ट्राच्या मतदार यादीत सुमारे 9 कोटी 78 लाख 54 हजार मतदार होते. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यापैकी 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांची नावे यादीत कायम राहिली आहेत. उर्वरित मतदारांचे गणना अर्ज उपलब्ध न झाल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

या वगळलेल्या मतदारांमध्ये पत्ता सापडला नाही, मतदार स्थलांतरित झाला, मृत्यू झाला, दुबार नोंदणी झाली किंवा इतर कारणे अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे 2.07 कोटी हा अंतिम वगळणीचा आकडा नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पात्र मतदारांना दावा-हरकतीच्या प्रक्रियेत आपले नाव पुन्हा समाविष्ट करून घेता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नावे वगळली. Election Commission of India

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यात 28 लाख 66 हजार 481 मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसत नाहीत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात 28 लाख 59 हजार 377 आणि मुंबई उपनगरात 26 लाख 58 हजार 202 मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. या तीन जिल्ह्यांतील प्रकरणे राज्यातील एकूण वगळलेल्या नावांच्या सुमारे 40.5 टक्के आहेत.

मतदारांनी नाव तपासणे महत्त्वाचे. Election Commission of India

SIRनंतर प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे प्रत्येक पात्र मतदाराने तपासणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर तसेच पुणे जिल्हा प्रशासनाच्या SIR पोर्टलवर प्रारूप मतदार यादी आणि नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाव प्रारूप यादीत आढळले नाही तर संबंधित मतदाराने निर्धारित प्रक्रियेनुसार दावा दाखल करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे की प्रारूप यादीतील अनुपस्थिती म्हणजे मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीतून कायमचे वगळले गेले, असा त्याचा अर्थ होत नाही.

मतदार यादीत नाव नसेल तर मतदानाचा अधिकार प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासून आवश्यक असल्यास वेळेत दावा दाखल करणे गरजेचे आहे.

Leave a Comment