Close Visit MahaNews12

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश; लाभ वेळेत देण्याच्या सूचना

मुंबई : Retired Employees Pension Update :  सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनविषयक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. निवृत्तीवेतनाची प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

काही कार्यालयांमध्ये निवृत्तीवेतनाची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर पेन्शन प्रकरणांची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला आहे. Retired Employees Pension Update

कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहणार आहे. नियुक्ती, वेतन, पदोन्नती, वेतनवाढ, रजा, नामनिर्देशन तसेच कुटुंबीयांची माहिती यांसारख्या नोंदी वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्षे अगोदर वेतन पडताळणीची कार्यवाही सुरू करून ती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महालेखापाल कार्यालयाकडून काही त्रुटी किंवा आक्षेप नोंदवले गेल्यास त्यांची पूर्तता प्राधान्याने करून १५ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

पेन्शन प्रकरण मंजूर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सेवाथ प्रणालीमध्ये ऑनलाइन अपलोड करून संबंधित कोषागार किंवा अधिदान व लेखा कार्यालयाकडे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर निवृत्तीवेतनाचे प्रथम प्रदान, अंशराशीकरण आणि उपदानाची रक्कम संबंधित निवृत्तिवेतनधारकाच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली जाते.

दरम्यान, पेन्शन प्रकरणात विलंब होऊन त्यासाठी व्याज देण्याची वेळ आल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. अशा प्रकरणात शिस्तभंगाची कार्यवाही तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात नोंद करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. Retired Employees Pension Update

त्यामुळे निवृत्तीपूर्वीच सेवापुस्तक, वेतन पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित करण्याचे महत्त्व या शासनाच्या निर्देशांमधून स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment