TET नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेवरही होणार विचार
नवी दिल्ली : TET Rules Update : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET संदर्भातील नियमांबाबत केंद्र सरकारकडून मोठी हालचाल सुरू झाली आहे. TETचे विद्यमान नियम आणि पात्रता निकषांचा व्यापक फेरआढावा घेण्याचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मांडला आहे. यामध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणींचाही विचार केला जाणार आहे.
शिक्षक, शिक्षक संघटना, राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित घटकांकडून प्राप्त झालेल्या निवेदने व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. TETची पात्रता, परीक्षा घेण्याची पद्धत तसेच संबंधित नियमांचा सविस्तर विचार केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी TETचा मुद्दा सध्या महत्त्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २९ मे २०२६च्या निर्णयानंतर TET पात्रता मिळविण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२८पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पात्र शिक्षकांना पुरेशी संधी मिळावी यासाठी TET परीक्षा शक्यतो वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या काही शिक्षकांना न्यायालयाने TETमधून मर्यादित सवलत दिली आहे. मात्र अशा शिक्षकांना TET पात्रता मिळेपर्यंत पदोन्नतीचा लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रस्तावित फेरआढाव्यात नेमके कोणते बदल केले जातात, सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेबाबत काय निर्णय घेतला जातो आणि TETच्या नियमांमध्ये कोणत्या सुधारणा होतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








