पुणे : MHADA Lottery 2026 : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाच्या पुराव्याबाबत दिलासा मिळाला आहे. आता अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र (ITR) सादर करता येणार आहे.
यापूर्वी या सोडतीसाठी केवळ आर्थिक वर्ष २०२५-२६ चा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याची अट होती. मात्र, नुकत्याच दाखल झालेल्या २०२५-२६ या वर्षाच्या ITR ची आयकर विभागाकडून ऑनलाइन पडताळणी होण्यास वेळ लागत असल्याने अर्जदारांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न पुरावा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
४,४६२ घरांची सोडत. MHADA Lottery 2026
पुणे म्हाडाच्या या सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना याअंतर्गत एकूण ४,४६२ सदनिका उपलब्ध आहेत. यामध्ये २० टक्के योजनेतील २,९७१ तर १५ टक्के योजनेतील १,४९१ घरांचा समावेश आहे.
ही घरे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीए क्षेत्रात उपलब्ध आहेत. क्षेत्रनिहाय पाहता पुणे महापालिका क्षेत्रात १,४६८, पिंपरी-चिंचवडमध्ये १,४०६ आणि पीएमआरडीए क्षेत्रात १,५८८ घरे आहेत.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा. MHADA Lottery 2026
या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. अनामत रक्कम ऑनलाइन तसेच RTGS/NEFT द्वारे भरण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पात्र अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून, त्यावर १ ऑक्टोबरपर्यंत हरकती व दावे करता येतील. अंतिम स्वीकृत यादी ८ ऑक्टोबरला जाहीर होणार असून, संगणकीय सोडतीचा निकाल १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर होणार आहे.
म्हाडाच्या या निर्णयामुळे २०२५-२६ च्या उत्पन्न पुराव्याच्या पडताळणीमुळे अर्ज करताना अडचणी येणाऱ्या नागरिकांना पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांना आता २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी उपलब्ध असलेला उत्पन्न पुरावा सादर करून सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








