Close Visit MahaNews12

एसटी महामंडळाचा मोठा दणका! अमरावती-नाशिकमधील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; दोषी ठरल्यास बडतर्फीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रशासकीय शिस्तीबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. कामातील हलगर्जीपणा, नियमभंग आणि कर्तव्यातील कसूर आढळल्याने अमरावती व नाशिक विभागातील एकूण १२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक विभागातील तब्बल ११ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने एसटी प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांच्यावर कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचा तसेच कामात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होऊ शकते.

नाशिक विभागात ११ अधिकारी निलंबित

नाशिक विभागात कामकाजातील गंभीर त्रुटी, जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष आणि प्रशासकीय निष्काळजीपणा आढळल्याने ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन वर्ग-१ अधिकारी, आठ वर्ग-२ अधिकारी, दोन आगार व्यवस्थापक आणि नऊ वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

विशेष समितीच्या अहवालानंतर मोठा निर्णय.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यालयाने विशेष नियंत्रण समितीची स्थापना केली होती. १० जून रोजी दोन सदस्यीय समितीने नाशिक विभागात अचानक तपासणी केली. या तपासणीत अनेक कार्यालयांमध्ये गंभीर त्रुटी, कामातील निष्काळजीपणा आणि प्रशासकीय उणिवा आढळून आल्या. समितीच्या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आदेश स्वीकारले नाही तरी कारवाई होणार

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निलंबनाचे आदेश स्वीकारण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिल्यास ते त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर टपालाद्वारे पाठवले जातील. त्यामुळे कारवाई टाळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा स्पष्ट संदेश एसटी प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment